बीड : पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संभाजी वाल्हेकर हे पत्नीसह गुरुवारी रात्री अंगणात झोपले होते. पत्नी झोपेत असताना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पतीने तिचा खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीचा भाऊ दौलत वाल्हेकर याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात आरोपी संभाजी शिवाजी वाल्हेकर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाच्या घटनेची माहिती कळताच आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी भेट दिली आहे.
बेवारस महिलेचा मृतदेह आढळला: बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत उक्कडगाव परिसरात एका महिलेचा मृतदेह विहिरीत टाकल्याची घटना घडली आहे. गळा कापून एका 32 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आहे. उक्कडगाव शिवारात गणेश आठवले यांची शेती आहे आणि या शेतामध्ये विहीर असून त्या विहिरीमध्ये एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास भारती, पीएसआय खरात , बीट अंमलदार मेखले यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
बीडमध्ये मोबाईलच्या वादातून खून: बीडमध्ये काल (गुरुवारी) मोबाईल चोरी गेल्याची तक्रार नोंदविल्याने मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. सोलापूर धुळे महामार्गावर बिंदुसरा तलावाजवळ दोन दिवसांपूर्वी एक अनोळखी मृतदेह आढळून आला. अखेर 12 तासानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटविली. अक्षय राजेंद्र मडकर (वय 25 वर्षे; रा. अंकुश नगर) असे मृतकाचे नाव आहे. त्याने मोबाईल चोरीची पोलीस तक्रार दिल्याने त्याचाच मित्राने त्याचा खून केल्याचे तपासार समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हातावरील नावावरून पटली ओळख: माहितीनुसार, बिंदुसरा तलावाजवळ दोन दिवसांपूर्वी एक अनोळखी मृतदेह आढळला. एका चहाच्या टपरी चालकाने ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्याला फोनद्वारे कळविली. यानंतर बीड ग्रामीण पोलिसांचा ताफा तेथे तात्काळ पोहोचला. मात्र या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मृतदेहाच्या हातावर अक्षय नाव लिहिल्याने पोलिसांसमोर त्या मृतदेहाची ओळख पटवणे आणि खून का झाला? हे शोधणे आव्हानात्मक होते. मात्र अवघ्या 12 तासांत बीड ग्रामीण पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली आहे. हा मृतदेह बीड शहरातील अक्षय राजेंद्र मडकर या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले; मात्र हा खून कोणी आणि का केला याचे आव्हान देखील पोलिसांसमोर होते.