बीड - मागील एक वर्षापासून कोरोनाचे संकट आहेत. मागच्या तीन महिन्यात कसेतरी शासनाने उद्योगधंद्यांना सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, पुन्हा अजून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. परिणामी छोटे-मोठे उद्योग पुन्हा मंदावले आहेत. आता अशा सगळ्या बिकट परिस्थितीत व्यवसाय करायचा कसा, तसेच बँकेचे हप्ते फेडायचे कसे, अशी चिंता अनेक व्यावसायिकांना सतावत आहे. तर दुसरीकडे बँकेचे अधिकारी वसुलीसाठी तगादा लावत आहेत, अशा बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील व्यावसायिक सापडले आहेत.
कर्ज वसुलीसाठी बॅंकांचा तगादा -
राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अद्याप तरी बीडमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अधिक गतीने वाढ झालेली नाही. हे जरी खरे असले, तरी कोरोना पुन्हा येत आहे म्हटल्यावर उद्योगधंद्यांवर याचा विपरीत परिणाम दिसू लागला आहे. यामुळे बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अशा बिकट परिस्थितीत ज्या उद्योजकांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून उद्योगासाठी कर्ज घेतले आहेत, त्या उद्योजकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. व्यवसाय मंदावल्याने म्हणावे तसे उद्योगातून पैसे मिळत नाही. तसेच ज्यांनी बँकांचे कर्ज घेतले आहे, त्या बँकांचे अधिकारी कर्जाच्या वसुलीसाठी सतत तगादा लावत आहेत.
अनेकांना बँकांकडून नोटीस -
मागील आठ दिवसांत बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जदार उद्योजकांना वसुलीसाठी नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. बँकांनी उद्योगासाठी कर्ज दिले असल्यामुळे कर्जदारांना नोटीस पाठवणे नियमाप्रमाणे बरोबर असेलही मात्र सध्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम झालेला असल्यामुळे अनेक उद्योग बुडाले आहेत. बँकांचे कर्ज फेडण्याची इच्छा असतानादेखील उद्योग चालत नसल्यामुळे कर्जाची परतफेड कशी करणार, या चिंतेत अनेक उद्योजक आहेत.
खाजगी एजंटकडून केली जाते वसुली -
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून ज्या कर्जदारांना कर्ज दिले आहे. त्यांच्याकडून कर्ज वसुली करण्यासाठी खाजगी एजंट नेमण्यात आला आहे. या एजंटमार्फत उद्योजकांना कर्ज परतफेडीसाठी सक्तीने वसुली केली जात आहे. शासनाने कोरोनाचे संकट लक्षात घेता उद्योजक कर्जदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित आहे. मात्र, तशी परिस्थिती महाराष्ट्रात नसल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण : अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारे पत्र आले समोर