बीड- देशभरात इंधनदरवाढीविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. बुधवारी बीडमध्ये पेट्रोल दरवाढीचा निषेध करत, एक महिला वकील चक्क घोड्यावरून जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचली, या अनोख्या आंदोलनाची चर्चा शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. हेमा पिंपळे असे या वकीलाचे नाव आहे.
पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत, दुसरीकडे सामान्य मानसाला लॉकडाऊनचा फटका बसला आहे, पेट्रोलचे दर 100 रु. लीटर झाल्याने वाहनात पेट्रोल टाकने परवडत नाही. वकिली व्यवसाय सध्या ठप्प आहे, पेट्रोलचे दर वाढल्याने वाहनात पेट्रोल टाकने परवडत नसल्याने, आपण निषेध करण्यासाठी आज घोड्यावरून न्यायालयात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
सरकारने इंधनाच्या किंमती कमी कराव्यात
केंद्र सरकार जाणीवपूर्वक पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर खर्च गेला आहे. परिणामी समाजात गुन्हेगारी देखील वाढत आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने तात्काळ डिझेल व पेट्रोलच्या किंमती कमी करून, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी हेमा पिंपळे यांनी केली आहे.