बीड : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी निंदाजनक घटना बीडमधून समोर आली आहे. जिल्ह्यातील एका शाळेतून एचआयव्हीग्रस्त बालकांना शिक्षकांनी हाकलून दिल्याचा आरोप केला जात आहे. तर आम्ही विद्यार्थ्यांना हाकलले नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षकांकडून देण्यात आले आहे.
इन्फंट इंडियाच्या प्रमुखांनी केले आरोप
बीड तालुक्यातील पालीमध्ये इन्फंट इंडिया या संस्थेत राहणाऱ्या एचआयव्हीग्रस्त बालकांना जिल्हा परिषद शाळेतून हाकलल्यात आल्याची तक्रार संस्थेचे प्रमुख दत्ता बारगजे यांनी केली आहे. पालकमंत्र्यांकडे त्यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. मुलांना शाळेतून हाकलणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे सरकार आणि प्रशासन एचआयव्हीविषयी जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी हजारो कोटी खर्च करीत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेतून एचआयव्हीग्रस्त बालकांना हाकलल्याचा प्रकार निंदाजनक असल्याचे बोलले जात आहे.
मुख्याध्यापकांनी फेटाळले आरोप
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक के एस लाड यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. आम्ही या मुलांना हाकलून दिलेले नाही. या मुलांचा प्रवेशही आमच्याकडे नाही. याच संस्थेतील सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी आमच्याकडे शिकण्यासाठी येतात. आम्ही दुजाभाव करणार नाही असे स्पष्टीकरण लाड यांनी दिले आहे.
इन्फंट इंडियात एचआयव्हीग्रस्तांचा होतो सांभाळ
इन्फंट इंडिया या संस्थेत एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांचे संगोपन होते. या संस्थेत अनेक एचआयव्हीग्रस्त मुलं आहेत. तिथे त्यांचं पालन-पोषण केलं जातं. याच संस्थेतील मुलांबरोबर असा गंभीर प्रकार घडला आहे. संस्थेचे अध्यक्ष दत्ता बारगजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. जे कुणी या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.