किल्लेधारुर(बीड) - किल्ले धारूर तालुक्यास शनिवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील आवरगाव, पांगरी, तांदुळवाडी, हसनाबाद व परिसरात चक्रीवादळासह अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. यामुळे शेतकऱ्यांचे आणि काही नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भिंत कोसळून एक जण जखमी
शनिवारी दुपारी अचानकपणे आलेल्या पाऊस वाऱ्यामुळे आवरगाव तांदुळवाडी व परिसरामध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यात आवरगाव मध्ये सौदागर नखाते यांच्या घरावर पिंपळाचे झाड मोडून पडले. तर सुंदर दिगंबर जगताप यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. तसेच अंकुश लोखंडे यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने ते जखमी झाले आहेत.
या वादळी पावसामुळे अनेकांच्य घरामध्ये पावसाचे पाणी साचले. विद्युत वाहक तारा आणि खांबही तुटले आहेत, तसेच तालुक्यातील अनेकांच्या गोठ्यावरचे छत उडून गेले आहेत, तर काही जनावरे जखमी झाली आहेत.
शेतकऱ्यांचे नुकसान
या वादळ वाऱ्याने शेतकरी अमोल जगताप यांचा केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,प्रदीप नखाते यांचे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.