बीड- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शिरुर कासार नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि 4 नगरसेवकांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये 3 जुलैला अपात्र ठरविले होते. या जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाला नगरविकास राज्यमंत्र्यांकडून मंगळवारी स्थगिती देण्यात आली आहे. राज्यमंत्र्यांचा हा निर्णय सुरेश धस यांच्या गटासाठी दिलासादायक मानला जातोय.
रोहिदास गाडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्याच उमदेवाराला मतदान करण्यात यावे, असा व्हीप पक्षाने काढला होता. परंतु, त्यावेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या मीरा गाडेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आणि त्या भाजपच्या मदतीने निवडून आल्या. गाडेकर यांना मतदान करणार्या व राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या इतर चार नगरसेवकांविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यान्वये कारवाई करण्याची याचिका विश्वास नागरगोजे यांनी दाखल केली होती.
जिल्हाधिकार्यांनी यासंबंधी निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. सुनावणीअंती शिरुर कासारच्या नगराध्यक्षा आणि 4 नगरसेवकांनी पक्षांतरबंदी कायद्याचा भंग केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविले गेले. यात मीरा गाडेकर यांच्यासह कुसूम हरिदास, शेख शमा, आशा शिंदे, आश्विनी भांडेकर यांचा समावेश होता.
अपात्र नगरसेवकांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियमानुसार शासनाकडे अपील दाखल केले होते. अपीलाच्या अनुषंगाने नगरविकास राज्यमंत्र्यांकडून मंगळवारी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे नगराध्यक्षा मीरा गाडेकर आणि अन्य चार नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.