बीड - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व सीमाभागात पोलिसांचे चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. ठिकठिकाणी पोलीस तैनात असतानाही, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याच्या घटना घडत आहेत. माजलगाव येथे गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आठ लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बुधवारी गुटख्याची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो जप्त करुन 8 लाख 23 हजार 680 रुपयांच्या गुटख्यासह एकुण 14 लाख 23 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, असे बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पोलीस पथकाने पंचांसमक्ष पिकअपची पहाणी केली असता, त्यामध्ये 6 लाख 58 हजार रुपयांचा राजनिवास सुगंधीत पान मसाला , 1 लाख 64 हजार 736 रुपयांचा जाफराणी जर्दा , 6 लाखाचा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो, असा एकुण 14 लाख 23 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त पुढील कारवाईसाठी जमा करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व सीमाभागात पोलिसांचे चेक पोस्ट उभारलेले असताना जिल्ह्यात गुटखा कसा आला, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकंदरीतच लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यामध्ये गुटख्याच्या कारवाया लक्षात घेता, चेक पोस्टवर कार्यरत असलेल्या पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानंतर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आठ लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे.
माजलगावप्रमाणेच केज परळी व बीड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटका साठवून ठेवणे व विक्री करणे राजरोसपणे केले जात आहे. गुटखा माफियाकडुन बिनदिक्कत गुटखा पुरविला जात आहे. गेल्या काही दिवसांत अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.