गेवराई (बीड) - तालुक्यात कोरोना परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात एक ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामसमितीचे अध्यक्ष सरपंच असतील. ग्रामसमितीचे सचिव ग्रामसेवक असतील. तर वैद्यकीय अधिकारी, तलाठी, अंगणवाडी सेविका, कोतवाल हे सदस्य म्हणून काम पाहतील. अशा पद्धतीने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी ग्रामसमिती आपली जबाबदारी पार पाडेल, असा विश्वास आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे, अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतः ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. तसेच अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांनी बाहेर पडले पाहिजे. विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लक्ष्मण पवार यांनी अचानक कोविड सेंटरला भेट देऊन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण भागातील कोविड परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत ग्रामसमिती स्थापना करण्यात आली.