बीड - येथील शासकीय स्वस्त धान्य गोदामात ८१ लाख १५ हजार ४०३ रुपये इतक्या आधारभूत किमतीचे धान्य अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गोदामाचे गोदामपाल दिलीप लक्ष्मण भडके याने हा अपहार केला असल्याचे प्रथमदर्शनीत पुढे आले. तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या तपासणीत हे प्रकरण समोर आले आहे.
बीड तहसीलचे नायब तहसीलदार संजीव राऊत यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिलीप भडके याच्याविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत आरोपीला अद्यापर्यंत ताब्यात घेतलेले नसून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
शासनाकडून गोरगरिबांसाठी स्वस्त दरात धान्य दिले जाते. मात्र, बीडमध्ये स्वस्त धान्य गोदामात स्वतः गोदामपालानेच घोटाळा केला असल्याचे तहसीलदार यांच्यामार्फत केलेल्या चौकशीत समोर आले आहे. तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या पथकाने २ महिन्यापूर्वी बीड गोदामात जाऊन तपासणी केली होती. विशेष म्हणजे ज्या दिवशी तहसीलदारांचे पथक बीड गोदामाची तपासणी करण्यास गेले तेव्हा दिलीप भडके हा गोदामपाल जाणीवपूर्वक गैरहजर राहिला. अखेर तहसीलदार यांच्या पथकाने कुलूप तोडून गोदामातील धान्याचा पंचनामा केला.
यात ८१ लक्ष १५ हजार ४०३ रुपयांचे वेगवेगळ्या योजनेतील स्वस्त धान्य कमी असल्याचे आढळून आले. ही गंभीर बाब बीड तहसीलदारांनी वरिष्ठांना गोपनीय अहवालाद्वारे कळवली होती. याची गंभीर दखल घेत पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. नायब तहसीलदार संजीव राऊत यांच्या फिर्यादीवरून बीडचे गोदामपाल आरोपी दिलीप भडकेच्या विरोधात शासकीय स्वस्त धान्य गायब केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तपासणीमध्ये या शासकीय धान्याची आढळली तफावत -
तांदूळ - २११९.५० (क्विंटलमध्ये)
साखर - ८८.२२
तूर डाळ - २२.५०
चना डाळ - २२.२२
उडीद डाळ - १४.२८