बीड - महाराष्ट्र पोलीस खात्या अंतर्गत पोलीस शिपाई, ( Maharashtra Police recruitment ) चालक अशा सुमारे 18 हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आलेली आहे. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट सतत हँग होणे, सर्व्हर डाऊन होणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे.
15 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी- रात्र रात्र जागून उमेदवार आपले अर्ज भरत आहेत. यामुळे भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. या सर्व पात्र उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज करता यावा यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यातील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी ट्विट ( Tweeted by Dhananjay Munde ) करत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्याकडे केली आहे.
वेबसाईट सतत हँग - धनंजय मुंडे यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून, याआधी देखील पोलीस भरतीचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कोणत्या वर्षीचे सादर करावे. यावरून उमेदवारांमध्ये बराच संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेला. तो संभ्रम दूर झाल्यानंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे किंवा तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या एजन्सीच्या चुकीमुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठीची वेबसाईट सतत हँग ( Police recruitment website is down ) होणे किंवा सर्वर डाऊन असणे या बाबी सतत समोर येत असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी - अजूनही अनेक उमेदवार वेगवेगळ्या इंटरनेट कॅफेमध्ये, क्लासेसमध्ये किंवा मोबाईल वरून तासनतास बसून भरती प्रक्रियेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. भरती प्रक्रियेची अर्ज करण्याची मुदत संपत चालल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. अनेक उमेदवारांनी देखील अर्ज करण्यासाठी मुदत वाढवुन देण्याची मागणी विविध माध्यमांमधून केली आहे. यालाच अनुसरून धनंजय मुंडे यांनी भरती प्रक्रियेची मुदत 30 नोव्हेंबर पासून पुढे पंधरा दिवसांसाठी वाढविण्यात यावी, तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मागणीचा तातडीने सकारात्मक विचार व्हावा - ग्रामीण भागातील लाखो उमेदवार अनेक दिवसांपासून पोलीस भरती साठी पूर्वतयारी करत असतात, अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे एकही पात्र उमेदवार स्पर्धेतून बाहेर पडून त्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी संबंधित यंत्रणेने घेणे गरजेचे असुन, धनंजय मुंडे यांच्या मागणीचा तातडीने सकारात्मक विचार व्हावा, अशा भावना अनेक उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत.