बीड- दिल्ली येथील तुगलकाबाद येथे असलेले श्री. संत रविदास महाराज यांचे प्राचीन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाभरातील चर्मकार बांधवांची उपस्थिती होती. त्यांच्याकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, तुगलकाबाद येथील संत रविदास महाराज यांच्या मंदिराची जागा प्रशासनाने जबरदस्तीने बळकावून आपल्या ताब्यात घेतली आहे. ती जागा परत देऊन तेथे पुन्हा संत रविदास महाराज यांचे भव्य मंदिर केंद्र सरकारने बांधावे. संत रविदास महाराज हे सबंध देशभरातील चर्मकार समाजाचे श्रद्धास्थान आहेत. आमच्या या श्रद्धास्थानालाच हे सरकार उध्वस्त करू पाहत आहे. असे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत, असे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश सदस्य नारायण चांदबोधले, युवा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, हरिदास तावरे, राजू सोनवणे, परमेश्वर जाधव, ज्ञानोबा माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.