बीड- जिल्ह्यातील कल्याण-विशाखापटनम राज्य महामार्गावर कोळगाव नजीक तिहेरी अपघातात कारने पेट घेतला होता. यामध्ये ३५ वर्षीय महिला जागेवरच जळून होरपळून खाक झाली होती. तसेच १४ वर्षीय लावण्या देखील भाजली होती. तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी ५ वाजता लावण्याचा मृत्यू झाला असून या अपघातात मृतांची संख्या दोन झाली आहे.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे दुचाकी, स्कार्पिओ आणि कार यामध्ये तिहेरी अपघात झाला होता. त्यानंतर अपघातग्रस्त कारने अचानक पेट घेतला. या आगीत एक महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता तर लावण्या आणि तिचे वडील ज्ञानेश्वर जाधव यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.
ज्ञानेश्वर जाधव हे आपल्या कुटुंबियांसह कार (एम एच-14 एमएच - 8639) मधून पुण्याहून परभणीकडे निघाले होते. तेव्हा स्कार्पिओ (एम एच 16-बीडी - 2151) परभणी कडून पुण्याकडे निघाली होती. गेवराई तालुक्यातील कोळगाव शिवारात कारला अचानक एक दुचाकी (एमएच 23 एडी - 4596) आडवी आली. त्या दुचाकीला चुकवताना स्कार्पिओ आणि कार यांच्यात धडक झाली होती. यामध्ये कारने पेट घेतला. काही कळायच्या आतच कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.