बीड- सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे याचे गांभीर्य एका चार वर्षाच्या मुलीला असल्याचा प्रत्यय बीडमध्ये आला. अलंकृता लांडगे या चिमुकलीने खाऊसाठी जमा केलेली पिगीबँक कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी सुरु केलेल्या हेल्पलाइन नंबर एका चार वर्षाच्या मुलीचा फोन आला. फोनवर तिने मला जिल्हाधिकारी साहेबांना भेटायचे आहे. चार वर्षाच्या मुलीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे काय काम म्हणून अशोक तांगडे तुला कशाला भेटायचे बाळा असा प्रश्न अलंकृताला विचारला. ती म्हणाली, 'मला कोरोनाच्या रुग्णांच्या मदतीसाठी 'माझे खाऊचे पैसे द्यायचेत.' चिमुकलीचे बोबडे बोल ऐकल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. तागंडे यांनी तिची बीडचे जिल्हाधिकारी यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. भेटीत अलंकृताने आपल्या पिग्गी बँकेतील खाऊ साठी जमा केलेले दीड दोन हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
बीड शहरात राहणारे प्रा. रमेश लांडगे व अनुप्रिता लांडगे यांची चार वर्षाची मुलगी अलंकृता ही मागील तीन दिवसापासून आपल्या आई-वडिलांकडे हट्ट करत होती की, मला माझे खाऊचे पैसे जिल्हाधिकारी यांच्याकडे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी द्यायचे आहेत. सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी यांच्याशी कसा संपर्क साधणार ते केव्हा व कुठे भेटणार असा प्रश्न अलंकृताच्या वडिलांना पडला. मात्र, बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी लॉकडाऊनच्या काळात हेल्पलाइन सुरू केली असल्याचे रमेश लांडगे यांना माहीत होते. त्यांनी आपल्या मुलीला अशोक तांगडे यांचा नंबर लावून दिला.
सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी अलंकृता तिच्याशी साधलेला संवाद फेसबुकवर व्हायरल केला व बीडचे जिल्हाधिकारी यांच्याशी अलंकृताची भेट घडवून आणली. मागील आठ नऊ महिन्यापासून अलंकृताने आपल्या पिगीबँक मध्ये जमा केलेले पैसे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. एवढ्या लहान वयातही देशावर आलेल्या संकटाचे गांभीर्य अलंकृताला असल्याचे तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवले याचे सर्वांना आश्चर्य आणि कौतुकही वाटत आहे.