बीड – वाळू माफियांनी वाळू उपशासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. त्यात बुडून चार मुलांचा जीव गेला आहे. गेवराई तालुक्यातील मादलमोही जिल्हा परिषद गटातील शहजाणपूर चकला येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर, असे मृत बालकांचे नाव असून त्यांचे वय नऊ ते बारा वर्षांच्या दरम्यान आहे.
सिंदफणा नदीत गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. एक दोन नव्हे तब्बल दहा ते वीस फुटांपर्यंत खड्डे वाळू माफियांकडून नदी पात्रात करण्यात आले आहे. हा वाळू उपसा बंद करावा यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अनेकवेळा निवेदने दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. वाळू माफियांनी नदीपात्रात केलेल्या खड्ड्यात पाणी साचलेले आहे. या पाण्यात बुडून या चार बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - बीडमध्ये विहिरीत आढळले दोन सख्ख्या बहिणीचे मृतदेह; पोलीस तपास सुरु