बीड - साडेचार वर्षीय चिमुकल्याने 5 हजार 400 फूट उंचीचे कळसुबाई शिखर अवघ्या 3 तास 38 मिनिटांत सर केले आहे. या धाडसी मुलाचे नाव रिदम गजानन टाकळे, असे आहे. त्याने केलेल्या या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कळसुबाई शिखरावर जाऊन फडकवला तिरंगा -
कळसुबाई शिखर चढण्यासाठी प्रचंड क्षमतेची आवश्यकता असते. हे शिखर चढताना तरुणदेखील अनेक वेळा थकतात. मात्र, बीडच्या साडेचार वर्षाच्या चिमुकल्याने हे शिखर चढून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, कळसुबाई शिखरावर जाऊन रिदमने तिरंगा फडकवला आहे. 29 नोव्हेंबरला सकाळी सात वाजून 55 मिनिटांनी कळसुबाई शिखर चढण्यासाठी आम्ही सुरुवात केली होती. त्यानंतर न थांबता सकाळी 11 वाजून 33 मिनिटांनी आम्ही शिखरावर पोहोचलो. केवळ 3 तास 38 मिनिटांत पाच हजार चारशे फूट उंचीचे कळसुबाई शिखर रिदमने सर केले, अशी प्रतिक्रिया त्याचे वडील गजानन टाकळे यांनी दिली आहे.
रिदमला त्याचे वडील देतात प्रशिक्षण -
रिदमचे वडील गजानन टाकळे हे मागील साडेतीन वर्षांपासून रिदमला शिखर सर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करतात. एवढेच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यांविषयी सतत सांगत असतात. यामुळे रिदमला गड किल्ले पाहण्याची आवड निर्माण झाली. रिदमने आतापर्यंत रायगड, राजगड, लोहगड व सुधागड हे किल्ले सर केले असल्याचे त्याचे वडील अभिमानाने सांगतात.
25 डिसेंबरला सर करणार हरिश्चंद्रगड -
रिदम 25 डिसेंबरला हरिश्चंद्रगड सर करणार आहे. तसेच कळसुबाई शिखर सर केलेल्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये व्हावी, अशी अपेक्षा वडील गजानन टाकळे यांनी व्यक्त केली आहे.