आष्टी (बीड) - राज्य सरकार हे केंद्र सरकारवर अवलंबून राहिले. राज्याने स्वतःच्या निधीतून काहीच केलं नाही. लस खरेदी करू असा ठराव घेतला, परंतु हे चार महिन्यांपूर्वी केलं असतं तर इतके रुग्णांचा मृत्यू झाला नसता, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी राज्य सरकारवर केली आहे. आपणही समाजाचे देणे लागत असल्याने आपण आपल्या एक महिन्याच्या पेन्शनची रक्कम एक लाख रुपयांचा धनादेश कोविड रुग्णांसाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे सुपूर्द करत असल्याचे धोंडे यांनी सांगितले.
बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे धनादेश सुपूर्द केल्यानंतर माजी आमदार भीमसेन धोंडे पञकारांशी बोलताना म्हणाले, की राज्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आपला दोन दिवसांचा पगार कोविड निर्मूलनासाठी द्यावा. तसेच आघाडी सरकारवर टीका करत सरकारी रुग्णालयात गोरगरीब कोविड रुग्णांनी जावे कारण खासगी रुग्णालयात दीड ते दोन लाख रुपये बिल करून लूट करत आहेत. रेमडेसिवीर या इंजेक्शनचे वाटप पारदर्शक व्हावे. हे इंजेक्शन बीड जिल्ह्यात किती आले कोणाला कीती दिले हे माध्यमातून प्रसिद्ध करावे म्हणजे इंजेक्शनचा काळाबाजार होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.