बीड - बीड जिल्ह्यात वाढत्या कोणाच्या प्रादुर्भावामुळे जमावबंदीचे आदेश लागू आहेत. तरीही लग्न समारंभाला गर्दी जमवल्यामुळे वधू-वरासह 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी घडली.
हेही वाचा - ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू
300 जणांवर गुन्हे दाखल
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच सर्वत्र जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असताना बीड तालुक्यातील कन्हैय्या हॉटेल येथे मोठ्या जल्लोषात विवाह सोहळा संपन्न झाला. याची माहिती पोलीस प्रशासनाला होताच हॉटेलमालक, वधुवरांसह तीनशे जणांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्हैय्या लॉन्स येथे विवाह सोहळ्यासाठी मोठी गर्दी
धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा परिसरातील कन्हैय्या लॉन्स येथे विवाह सोहळ्यासाठी मोठी गर्दी झाली असल्याची माहिती नेकनूर पोलीसांना मिळाली. धारुर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण, जिल्हा औरंगाबाद येथील ऋतुजा दिपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा होता. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे ग्रामसेवक जगदीश कडू यांच्या फिर्यादीवरून वधु-वर, त्यांचे आई-वडील, मामा, देवबप्पा, हॉटेल मॅनेजर यांच्यासह तीनशे जणांवर कलम 188, 269, 270 भादवि साथरोग आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वेय नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सपोनि.लक्ष्मण केंद्रे, फौजदर विलास जाधव, यांच्यासह कर्मचार्यांनी केली.
हेही वाचा - शिवथाळी : पार्सल देण्याचा आदेश आलेला नाही; महापालिकेतील कॅन्टीन चालकाची माहिती