बीड - देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या आघाडीचे सरकार आले तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले आहे. मोदी सरकारप्रमाणे आम्ही फसवी घोषणा करत नाही. आम्ही या देशातील शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला ६ हजार रुपये याप्रमाणे वर्षाला ७२ हजार रुपये देऊ. त्यासाठी आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना विजयी करा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेतून केले आहे.
बीड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ माजलगाव, वडवणी तालुक्याचा दौरा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी केला. यावेळी उपळी येथे आयोजित सभेत बोलताना ते म्हणाले, की फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी फसवी निघाली. शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नाही. देशात आघाडीचे सरकार आले तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. कर्जमाफीबद्दल आम्ही आमच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलेले आहे.
मोदी सरकारप्रमाणे आम्ही फसव्या घोषणा करत नाही. शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याला ६ हजार म्हणजे वर्षाला ७२ हजार रुपये आम्ही देणार आहोत. या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडून द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.
भाजप सरकारने शेतकऱ्यांना ५ वर्षात काहीच दिले नाही. मात्र, शेतकऱ्यांना कधी बँकेच्या रांगेत तर कधी बी-बियाणांच्या दुकानाच्या रांगेत उभे केले. नोटबंदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरा दिला. काळा पैसा आणण्यामध्ये भाजप अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर हमीभाव देऊ, अशी घोषणा केली होती. मात्र, त्या घोषणेची कुठेच अंमलबजावणी झालेली दिसत नसल्याची टीकाही मुंडे यांनी यावेळी केली.
या सभेला माजी मंत्री प्रकाश सोळंके, काँग्रेसचे अशोक हिंगे, उमेदवार बजरंग सोनवणे, मोहन सोळंके, सर्जेराव काळे, जयसिंग सोळंके यांची उपस्थिती होती. बीड लोकसभा मतदार संघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात वळत आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांकडून वडवणी, धारूर, माजलगाव तालुक्यात प्रचार सुरू आहे.