बीड - यंदा सोयाबीनच्या बियाणामध्ये मोठ्या प्रमाणात बोगसगिरी समोर आली आहे. सोयाबीनचे पेरलेलं बियाणे उगवले नसल्याने बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदुरघाट येथे आज (रविवार) दुपारी घडली.
संबंधित शेतकरी अंगावर रॉकेल व डिझेल ओतून घेत असल्याचे पाहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तत्काळ त्या शेतकऱ्याच्या हातातून डिझेलचे कॅन हिसकावून घेतले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. लालासाहेब तांदळे या शेतकऱ्याने नांदूरघाट येथील कृषी सेवा केंद्रावरुन सोयाबीनचे बियाणं खरेदी केलं होतं. ते बीयाणं त्यांनी शेतात नेऊन पेरले. मात्र, पेरणी केल्यानंतर पाच सहा दिवसानंतर ते बियाणे उगवले नाही. पेरणीसाठी झालेला एकरी 10 ते 15 हजार रुपयांचा खर्च यामुळे नैराश्य आलेल्या लालासाहेब तांदळे यांनी ज्या कृषी सेवा केंद्रावरून ते बोगस सोयाबीनचे बियाणे नेले होते, त्याच दुकानासमोर अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच घाटनांदूर येथील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधित शेतकऱ्याला समजावून सांगत पुढील चौकशी सुरू केली आहे.