बीड Farmer Get 1 Rupees Kg Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यानं एक रुपया किलोनं कांदा विकला. या कांद्यातून आलेल्या रकमेपैकी व्यापाऱ्यालाच खिशातून 565 रुपये द्यावं लागल्यानं शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे. त्यामुळं कांद्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणल्याचं बीडमधील या शेतकऱ्याला मिळालेल्या कांद्याच्या उत्तपन्नातून उघड झालं आहे. वैभव शिंदे असं या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नाव आहे. वैभव शिंदे यांनी सोलापूर इथं कांदा विकण्यासाठी नेला होता. मात्र तिथं त्यांना एक रुपये किलो दरानं कांदा विकावा लागला.
मी सोलापूर मार्केटला कांदा घेऊन गेलो होतो. त्या ठिकाणी 1 रुपये दरानं कांदा विकला आणि काही कांद्याचा तर लिलावाच झाला नाही, तो कांदा मी त्या ठिकाणीच फेकून दिला. कांदा लागवडीसाठी आम्हाला 70 हजार रुपये खर्च झाला. मात्र त्यातून उत्पन्न मिळालं नाहीच, उलट 665 रुपये भुर्दंड भरावा लागला. - वैभव शिंदे, कांदा उत्पादक शेतकरी
शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल : राज्यातील अनेक शेतकरी शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्यानं हवालदिल झाले आहेत. शेतीमध्ये मेहनत करुन पिकवलेला माल योग्य दरात विकला तर शेतकऱ्यांच्या हातात दाम येतो. नाहीतर अनेक अडचणीचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. बीडच्या नेकनूर गावातील वैभव शिंदे या शेतकऱ्यानं आपला कांदा सोलापूर इथल्या मार्केटला घेऊन नेला होता. मात्र त्यांना एक रुपये किलोनं कांदा विकावा लागला.
व्यापाऱ्यानं पैसे दिले खिशातून : वैभव शिंदे यांनी सोलापूर मार्केटमध्ये कांदा विकण्यासाठी नेला होता. त्यांचा 98 किलो कांदा एक रुपया दरानं विकला गेला. या कांदा विक्रीतून त्यांना 98 रुपये मिळाले. मात्र दुसरीकडं कांदा विकण्यासाठी त्यांना हमालीचा खर्च 35 रुपये आला. तोलाईचा खर्च 20 रुपये आला. स्त्री हच्या मथळ्याखाली आणखी 13.50 रुपये खर्च आला. भाडा वारणी खर्च 594 रुपये आला. त्यामुळं एकूण खर्च 663 रुपये आला. मात्र कांदा विक्रीतून फक्त 98 रुपये आले होते. त्यामुळं एकूण विक्री किमतीतून खर्च वजा केला असता, 665 वैभव शिंदे यांनाच खिशातून भरावे लागले. त्यामुळं मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना कांद्यानं रडवलं : वैभव शिंदे या शेतकऱ्यानं काही दिवसापूर्वी टोमॅटो चांगल्या दरानं विकले होते. त्यानंतर त्यांनी कांदा देखील चांगल्या दरानं विकला. मात्र त्यानंतर काही दिवसातंच टोमॅटोचे भाव खाली आले, त्याच पद्धतीनं कांद्याचे भाव देखील कमी झाले. यामुळं कांदा उत्पादन करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र शासनानं कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळं शेतकऱ्याच्या कांद्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळं सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कांदा उत्पादन करण्यासाठी लागलेला खर्च देखील शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. वरतून शेतकऱ्यालाच 565 रुपये भुर्दंड द्यावा लागला. शेतमालाला हमीभाव नसल्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे.
कांदा पिकावरील निर्यात बंदी उठवावी : "सरकारनं तुमच्या मालाला दुप्पट भाव करू, असं स्पष्ट केलं होतं. मात्र दुप्पट भाव तर झालाच नाही, पण आहे त्या किमती कमी झालेल्या आहेत. मागील 2 वर्षांपूर्वी सोयाबीनचे भाव 7 हजार रुपये, 8 हजार रुपये होते. त्यानंतर आता 4500 रुपयांनी सोयाबीन विकावी लागली आहे. कापूस 10 ते 12 हजार रुपये विकला जात होता. आता 7 हजार रुपये क्विंटल विकावा लागत आहे. त्यामुळं दुप्पट भाव करायचं तर सोडाच, मात्र यामध्येही कमी भाव केले आहेत. कांदा पिकावरील निर्यात बंदी उठवावी, नाहीतर याच्यापेक्षा बेकार दिवस शेतकऱ्याला येतील" असं वैभव शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
कांदा लागवडीसाठी आला 70 हजार रुपये खर्च : "आम्ही यावर्षी कांदा लागवड केली आणि कांदा लागवडीतून चांगलं उत्पादन येईल असं वाटलं होतं. कांदा लागवडीसाठी आम्हाला जवळपास 70 हजार रुपये खर्च झाला. कांदा बियाणं असेल, खताचा खर्च, लागवड, खुरपण यासारखा खर्च आम्ही केला. आम्हाला त्यातून उत्पादन तर मिळालंच नाही, मात्र भुर्दंड मात्र भरावा लागला. आम्ही त्या ठिकाणी कांदा नेऊन एक रुपया दर आम्हाला मिळाला. त्यामुळं सरकारकडं आमची मागणी आहे, की आमच्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा आणि हमीभाव जर दिला तर आम्ही शेतकरी जगू" असंही शेतकरी वैभव शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :