बीड - गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथे पाइपलाइन टाकण्यासाठी जमीन खोदण्याच्या काम सुरू असताना रविवारी रात्री जेसीबीखाली चिरडून दोघांचा मृत्यू झाला. शेतात रात्रीच्यावेळी पाइपलाइनसाठी खोदकाम सुरू होते. तिथे जवळच वडील आणि मुलगा झोपले होते. अंधार असल्यामुळे जेसीबी चालकाला न दिसल्याने ते जेसीबीखाली चिरडले गेले. यामध्ये शेतकरी बापाचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना येथे रविवारी रात्री उशिरा घडली.
गेवराई तालुक्यातील मारफाळा तांडा येथील अंकुश राठोड यांच्या शेतात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने पाइपलाइनसाठी जमीन खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी शेतकरी साहेबराव रुपा राठोड व त्यांचा मुलगा मनोज हे शेतात झोपले होते. रात्रीच्यावेळी अंधार असल्याने हे बाप-लेक जेसीपी चालकाला दिसले नाहीत. परिणामी ते दोघेही जेसीबीच्या खाली चिरडले गेले. यात साहेबराव राठोड ( वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा मनोज राठोड हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर जेसीबी चालक फरार झाला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.