बीड - तसं पाहिलं तर मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी असतं. त्याच्यात बीडमध्ये तर कायम दुष्काळ असतो. परंतु या परिस्थितीत रडत बसण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये नवे प्रयोग करण्याचे धाडस जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यामधील शांतीवन प्रकल्पाच्या माध्यमातून दीपक नागरगोजे या आवलियाने केले. अनेक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन 500 हेक्टर क्षेत्रावर आंबा, केळी, डाळिंब, अद्रक ही पिके इस्रायली तंत्रज्ञान वापरून घेतली जात आहे. हा नवा प्रयोग शांतीवन प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यात राबवला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बीड जिल्हा तसा कायम दुष्काळी जिल्हा. ऊस तोड कामगार मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातून स्थलांतर करतात. केवळ पावसाच्या पाण्यावर शेती करणे, म्हणजे नुकसानीची शेती आहे. हे लक्षात आल्यानंतर शांतीवन प्रकल्पाचे प्रमुख दीपक नागरगोजे यांनी आर्वी शिवारातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एकत्र केले. शेतकऱ्यांना शांतीवन प्रकल्पाच्या माध्यमातून शेततळे निर्माण करून दिले
50 शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे -
शेतीसाठी लागणारे पाणी जेव्हा आपल्याकडे उपलब्ध असते. तेव्हा आपण कोणतेही पिक घेऊ शकतो. गेल्या दीड वर्षात 50 शेतकऱ्यांचे शेततळे बांधून तयार झाले आहेत. एवढेच नाही, तर यंदा झालेल्या पावसामध्ये हे सर्व शेततळे पाण्याने भरले आहेत. पाणी उपलब्ध झाल्यानंतर शांतीवन प्रकल्पाच्या माध्यमातून इस्राईलचे तंत्रज्ञान दिपक नागरगोजे यांनी स्वतः अवगत करून अगोदर आंब्याची लागवड केली. त्यानंतर आद्रक, मोसंबी, लिंबू केळी ही पिके शेतकऱ्यांना लागवड करून देण्यासाठी मदत केली. अत्यल्प पाण्यावर ही पिके येऊ शकतात, असे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात विकसित केले आहे.
![बीड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9540073_599_9540073_1605314973351.png)
दोन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा -
आमच्या भागातल्या आम्ही निवडलेल्या 50 शेतकऱ्यांकडे पुढील दोन वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा शेततळ्यामध्ये आज घडीला आहे. याचा परिणाम शेतकरी नगदी पैशाची पिके घेऊ लागला आहे. शेतकऱ्यांचा खर्च कमी व उत्पन्न अधिक झाले आहे, असे दीपक नागरगोजे यांनी सांगितले.
हा प्रयोग व्यापक करणार-
जिल्ह्यात अशी अनेक गाव आहेत. ज्या गावात शेती विषयावर शांतीवन प्रकल्पाने काम केले आहेत. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. नागरिकांची जीवनशैली सुधारली आहे. त्यामुळे शांतीवनचा हा प्रोजेक्ट व्यापक होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार असल्याचेही शांतीवनच्या वतीने सांगण्यात आले. हा बदल काही दोन चार दिवसात झालेला नाही. गेली पाच वर्षापासून शांतीवन प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेती प्रश्नावर काम करत आहे. येणाऱ्या पाच वर्षात शिरूर तालुक्यात इस्राईल तंत्रज्ञान वापरून शेती करणारे सर्वाधिक शेतकरी असतील, असा विश्वास दीपक नागरगोजे यांनी यावेळी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला.