बीड - धनंजय मुंडेंनी बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार भल्या पहाटेपासूनच सुरू केला आहे. परळीमध्ये पहाटे फिरायला गेल्यानंतर देखील धनंजय मुंडेंनी बैठक घेऊन बजरंग सोनवणेंना मतदान करण्याचे आवाहन केले. सर्वच पक्ष नियोजन करून नेटाने प्रचार करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही मागे नाहीत. धनंजय मुंडेंनी बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार भल्या पहाटेपासूनच सुरू केला. परळीमध्ये पहाटे फिरायला गेल्यानंतरदेखील धनंजय मुंडेंनी बैठक घेऊन बजरंग सोनवणेंना मतदान करण्याचे आवाहन केले.
मागील २ दिवसांपासून बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. सोमवारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे उमेदवार आपले शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचाराची राळ उठवली आहे. शनिवारी पहाटे धनंजय मुंडेंनी मॉर्निंग वॉक करत-करतच प्रचार केला. परळी शहरातील मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांची बैठक घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
सोमवारी भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे तर राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. प्रचाराची रणधुमाळी बीड लोकसभा मतदारसंघात वेग घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.