बीड - एकीकडे कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. दुसरीकडे मात्र बीडमध्ये पोलिसांकडूनच कोरोना नियमांना हरताळ फासण्यात येत आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 12 मोटरसायकलचा लिलाव करण्यात आला. या दरम्यान पोलीस ठाण्यातच पोलिसांची आणि वाहन खरेदी करणाऱ्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
एकीकडे कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने पोलिसांकडून सर्व समान्यांवर कारवाई केली जात आहे, तर दुसरीकडे मात्र पोलिसांकडूनच या सर्व नियमांना धाब्यावर बसवले जात असल्याचे दिसून येत आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या लिलावादरम्यान जवळपास 100हून अधिक नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली. याठिकाणी नाही कोणता सोशल डिस्टन्स तर अनेक जणांनी मास्कदेखील लावले नव्हते, त्यामुळे नियम धुडकवणाऱ्या पोलिसांवर नेमकी कोण कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लिलावादरम्यान झालेल्या गर्दीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.