बीड - परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे खचलेल्या शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाले असले तरी काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. मात्र, उसनवारी करून लावलेल्या कापसाच्या पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.
हेही वाचा - वर्ध्यात दिवाळी दिवशीच बहीण भावाचा बुडून मृत्यू; तलावात आढळले मृतदेह
बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील शेतकर्यावर अस्मानी संकटाचा डोंगर कोसळला आहे. शेतातील उभे पीक अती पावसाने जळून गेले आहे. सद्यस्थिती शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके आहेत. तर काही ठिकाणी ज्वारीची पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांनी उसनवारी करून रब्बीची पेरणी केली होती. मात्र, अति पावसामुळे सर्व पिकाचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी घुसल्याने पिके पिवळी पडली असल्याचे चित्र पाहायला मिळते तर बहुतांश ठिकाणी कापसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पिक आता येणे शक्य नाही. म्हणून या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.