बीड - येथील उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांना जिल्हाधिकाऱ्यानी बुधवारी तडकाफडकी कार्यामुक्त केले. गेवराई तालुक्यातील राजापूर येथील अवैध वाळू साठा आणि बीड तालुक्यामधील छावणीतील गैर प्रकारप्रकरणी त्यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले आहे. मात्र, कार्यमुक्ती आदेशात मुळे यांच्या प्रकृतीचे कारण पुढे करण्यात आले आहे.
बीडचे उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी एकतरफी कार्यामुक्त केले आहे. मुळे यांच्या जागी परळी येथील उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांना नियुक्ती दिली आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळ आहे. आशावेळी पूर्ण वेळ देऊन सक्षमपणे काम करणारे अधिकारी आवशयक असून मुळे यांच्या प्रकृतीचे कारण पुढे करत ते काम करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे शासनाची कामे होण्यास विलंब होत असल्याचे कार्यामुक्त आदेशात म्हटले आहे.
बीड जिल्हा प्रशासनात सध्या मोठ्या प्रमाणावर अनागोंदीची परिस्थिती आहे. जिल्ह्यात अगोदरच अधिकार्यांचा तुटवडा असताना उपलब्ध अधिकारीही काम करत नाहीत अशी ओरड सुरु आहे. बीडचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्या बाबतीत अशाच तक्रारी समोर आल्या होत्या. निवडणूकीनंतर त्यांच्या उपविभागातील प्रशासकीय कामे रखडल्याचे सांगीतले जाते. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकार्यांनी राजापूर येथून शेकडो ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला होता. या वाळूसाठ्याकडे प्रभोदय मुळे यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगीतले जाते. यासंदर्भात त्यांची विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रभोदय मुळे यांनी शासनाकडे विनंती बदलीचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यावर निर्णय होण्याअगोदरच जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी त्यांना एकतर्फी कार्यमुक्त केले आहे. बीड उपविभागाचा अतिरीक्त पदभार परळीचे उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांच्याकडे देण्यात आला आहे.