अंबाजोगाई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीड जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महावितरणाच्या वरिष्ठ यंत्रणेशी चर्चा केली. यावेळी परळीच्या थर्मल पावर प्लांट मधील युनिट क्र. ८चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
थर्मल पावर प्लांटमधील या ऑक्सिजन निर्मिती प्लांटद्वारे दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथील एसआरटी ग्रामीण रुग्णालयात २४ तासात साधारण ३०० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन तयार होईल व यामुळे येथील ऑक्सिजनचा तुटवडा कायमचा मिटणार आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ साठून पाणी खराब होऊ नये, यासाठी हा ऑक्सिजन प्लांट कार्यन्वित करण्यात येतो. केंद्रातील युनिट क्र. ६ व ७ मधील ऑक्सिजन प्लांट पूर्ववत राहतील. युनिट क्र. ८मधला प्लांट मात्र अंबाजोगाईला शिफ्ट करण्यात येत आहे.
या प्लांटला कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री परळी थर्मल प्लांट प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. एसआरटी रुग्णालयात यासाठी लागलेल्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. उद्या (16 एप्रिल) ही सामग्री अंबाजोगाई येथे पाठवण्यात येईल व येत्या १० ते १५ दिवसात या प्लँटद्वारे प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात होईल, अशी माहिती थर्मल केंद्राचे मुख्याधिकारी मोहन आव्हाड यांनी दिली. आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार एसआरटीमध्ये जाऊन जागेची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, एसआरटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे आदी उपस्थित होते.
एसआरटी रुग्णालयातील ऑक्सिजन रिसिव्हर टॅन्कची क्षमता एकावेळी २० हजार लिटर ऑक्सिजन साठवून ठेवण्याइतकी आहे. त्यामुळे येथे आता ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे सांगण्यात आले.
महावितरण मार्फत आलेल्या या सामग्रीचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाईला शिफ्ट करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्याधिकारी मोहन आव्हाड, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, एसआरटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांनी वेगाने सूत्रे हलवली. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्याचे काम उद्यापासून सुरू होणार आहे.