बीड - परळी विधानसभा मतदारसंघातील शिरसाळा येथे शुक्रवारी सायंकाळी धनंजय मुंडे यांची सभा झाली. भर पावसात धनंजय मुंडे यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. शरद पवार यांनीदेखील सातारा येथे भरपावसात सभा घेतली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या सभांची चर्चा राज्यभरात सुरू आहे.
साताऱ्यात शरद पवार यांनी तर त्यांचे शिष्य धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे भर पावसात भाजप सरकारविरुद्ध तुफान बॅटिंग केली. परळी येथील सभेत धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले. मुंडे यांनी नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या बीड जिल्ह्यातील प्रचार सभांसह उदयनराजेंच्या परळी येथील सभेचाही समाचार घेतला. भर पावसात समोर बसलेला जनसमुदाय भिजत असतानाही तब्बल 28 मिनिटे चाललेल्या भाषणात कुणीही जागचे हलले नाही.
हेही वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बीडकडे पाठ; एकदाही आले नाहीत प्रचाराला
मुंडेंनी मोदी परळीत आल्याने फरक पडेल का असे विचारताच उपस्थितांनी "परळीत नो सीएम नो पीएम, ओन्ली डीएम, ओन्ली डीएम" अशा घोषणा दिल्या. प्रकृती ठीक नसतानाही धनंजय मुंडेंनी त्याकडे दुर्लक्ष करत सभा गाजवल्या. उपस्थित श्रोत्यांनीही याला प्रचंड उत्साह दाखवला.