बीड : बीडच्या पाटोदा तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गहिनीनाथ गडावर, संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे. या 47 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गहिनीनाथ गडावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर गहिनाथगडावर नतमस्तक झाले असून त्यांनी गहनीनाथ बाबांसह वामन भाऊंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले आहे. यावेळी गडाच्या वतीने महंत विठ्ठल महाराजांनी फडणवीसांचा पुष्पहार घालत सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत गडाचे महंत विठ्ठल महाराज, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना समुद्राला वाहून जाणारे जे पाणी होते ते मराठवाड्याला आणण्यासाठी मी प्रयत्न केले आणि ते पाणी मराठवाड्याला मिळावे याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण हा प्रयत्न केला. त्याला आपण मंत्रिमंडळाची मान्यता ही दिली, दुर्दैवाने त्यानंतर आपले मंत्रिमंडळ राहिले नाही. म्हणून ते काम मागे राहिले. मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळाल्यानंतर पुन्हा तो प्रकल्प मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि तो प्रकल्प एसआयटीसीकडे मंजूर करून आता आपण एमडब्ल्यूआरची मान्यता घेत आहे. आणि एकदा ती मान्यता झाली की त्याचे टेंडर काढून येत्या काळामध्ये समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी गोदावरीच्या खोऱ्यात आणणार आहोत. मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचे काम आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भगरीथ प्रयत्नांना आशीर्वाद मिळावा: ते पुढे म्हणाले की, आपल्याला माहित आहे कृष्णा मराठवाडा सारखा प्रकल्प वर्षानुवर्ष कागदावर होता. तोही आपण आष्टीपर्यंत रेल्वे आणली आणि आता याही प्रकल्पाचे काम आता काही दिवसातच प्रत्यक्षात राबवणार आहोत. मी खऱ्या अर्थाने वामन भाऊंना आशीर्वाद मागत आहे की, वर्षानुवर्ष या ठिकाणी दुष्काळाने हरपलेला मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्याकरिता व या ठिकाणी पाणी आणण्याकरिता जे भगीरथ प्रयत्न आहेत त्या भगीरथ प्रयत्नांना आशीर्वाद मिळावा, असे आशीर्वाद वामन भाऊंनी आम्हाला द्यावेत, असे फडवणीसांनी सांगितले.
राजकीय चर्चांना उधाण : दरवर्षी मुंडे बहीण भाऊ हे एकाच व्यासपीठावर येऊन गडावर नतमस्तक होऊन दर्शन घेत असतात. मात्र, यंदा धनंजय मुंडे यांचा अपघात झाल्याने तर पंकजा मुंडे आजारी असल्याने गडावर येऊ शकले नाहीत. त्यामुळे मुंडे बहीण भावांच्या अनुपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.