बीड- मनामध्ये आत्मविश्वास असला की, कोणतीच गोष्ट अशक्य नसते. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर दहा दिव्यांग नागरीकांनी तीन हजार फूट उंचीचा लोहगड (जिल्हा पुणे) सव्वा दोन तासात सर केला. दिव्यांग असलेल्या नागरिकांसाठी ही प्रेरणादायी बाब असून याबाबत ईटीव्ही भारताने घेतलेला हा आढावा...
लोहगडची भूमी आम्हाला सतत प्रेरणा देते-
3420 फूट उंचीचा लोहगड केवळ सव्वा दोन तासात या दिव्यांग नागरिकांनी सर करून दाखवला आहे. या दिव्यांग नागरिकांमध्ये कोणी पायाने दिव्यांग आहे तर कोणी अंध आहे. शारीरिक व्यंग असताना देखील गड किल्ले चढण्याची क्षमता असलेले व शिवऊर्जा प्रतिष्ठानचे सदस्य असलेले बीड येथील शिक्षक कचरू चांभारे यांच्याशी ईटीव्ही भारत'ने संवाद साधला असता ते म्हणाले की, शिव ऊर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील आम्ही दिव्यांग नागरिक एकत्र आलो आहोत. औरंगाबाद येथील शिवाजी गाडे यांच्या पुढाकारातून शिव ऊर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत अनेक गड-किल्ले सर केलेले आहेत. आम्ही पुणे जिल्ह्यातील लोहगड सर करण्याअगोदर एकत्रित नियोजन केले होते. यापूर्वी कळसुबाई शिखर चढण्याचा आम्हाला अनुभव होता. त्या अनुभवाच्या जोरावरच 31 जानेवारी रोजी आम्ही आमची मोहीम लोहगडकडे वळवली होती. सुरुवातीला आम्ही मनाचा निश्चय केला. लोहगड चढायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेली लोहगडची भूमी आम्हाला सतत प्रेरणा देते. या प्रेरणेतूनच आमच्यामध्ये व्यंगत्व असताना देखील आम्ही लोहगड सर केला, असे दिव्यांग शिक्षक कचरू चांभारे म्हणाले.