बीड - कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेऊन तब्बल तीन महिने बाजारपेठा बंद होत्या. आता सरकारने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. बीडमध्ये सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या आहे. मात्र, अजूनही म्हणावे तसे ग्राहक बाजारपेठेत फिरकताना दिसत नसल्याची खंत बीड शहर आणि जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पूर्वीच्या तुलनेत 40 टक्क्यांहून अधिक घसरण व्यापारात झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर बाजारपेठेची काय परिस्थिती आहे, याबाबतीत 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला आहे.
कोरोनाच्या या संकटामुळे सर्व अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली आहे. मजुरांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वजण आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत बाजारपेठांवर याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. बाजारपेठेतील अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांवर थोडेफार ग्राहक पाहायला मिळतात. मात्र, इतर ज्या चैनीच्या वस्तू विक्री करणारी दुकाने आहेत, तिकडे मात्र ग्राहक फिरकताना दिसत नाही.
भविष्यातला अंदाज बांधणे अवघड झालंय...
उद्योग व्यवसायांना लागलेली घरघर कधी कमी होईल, हे सांगणे अवघड झाले आहे. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे नागरिक मोकळेपणाने बाजारात फिरकत नाहीत. हा प्रकार अजुन किती दिवस चालेल, हे सांगणे अवघड आहे. मात्र, सध्या जो ग्राहक बाजारात खरेदीसाठी येत आहे. तो ग्राहक देखील मुक्तपणे खरेदी करत नाही. ज्या वस्तू आवश्यक आहेत, त्यांचीच विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 'केवळ कपडे, सोने यांसह इतर चैनीच्या वस्तूंच्या बाजारपेठेत ही परिस्थिती आहे, असे नाही. तर, फळ विक्रेत्यांचा व्यवसाय देखील मंदावला असल्याचे' असलम बागवान यांनी सांगितले.
हेही वाचा... 'कोरोना महामारीला संधीमध्ये बदलून देशाला आत्मनिर्भर बनवूया'
लॉकडाऊनच्या काळात रखडलेली लग्न आता जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने होऊ लागलेली आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे बस्ता बांधायला येणार्या ग्राहकांची संख्या नसल्याने जिथे एक ते दीड लाख रुपये खर्च करून कपडे (लग्न बस्ता) खरेदी केले जायचे, तिथे आता केवळ नवरा-नवरीचे कपडे घेऊन वीस ते पंचवीस हजार रुपयांमध्ये बस्ता बांधला जात आहे. त्यामुळे ज्या प्रमाणात कपड्यांची विक्री व्हायला पाहिजे होती, ती होत नाही. अशी वस्तुस्थिती असल्याचे कापड व्यापारी राजेश मोजकर यांनी सांगितले.
कोट्यवधींची केली आहे गुंतवणूक...
व्यवसाय जी गुंतवणूक केली आहे, ती तशीच पडून आहे. एक तर तीन महिने खरेदी केलेला दुकानातील माल पडून राहिलेला आहे. त्यातच आता व्यवसाय सुरू केले, तर म्हणावे तसे ग्राहक बाजाराकडे फिरकत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली असताना देखील व्यवसायांना मंदीची घरघर लागलेली असल्याचे बीडच्या सुवर्णकारांनी सांगितले. लॉकडाऊन शिथिल झाले असले, तरिही तीन महिने कामधंदा बंद होता. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांवर देखील याचा मोठा परिणाम झालेला आहे.