बीड - सरकारने गावांचा विकास करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना ( MGNREGA 2005 ) महत्त्वकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. गावातील नागरिकांना वर्षातील 100 दिवस गावातच काम मिळून त्यांना गावातच रोजगार निर्माण ( Fraud In MGNREGA At Beed ) व्हावा, यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. मात्र या योजनेला भ्रष्टाचाराचे भूत लागल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ उडाला. बीड जिल्ह्यातील रेवकी गावात तर दोन वर्षापूर्वी मृत व्यक्ती रोजगार हमीच्या कामावर जात असल्याने नागरिकांना धक्काच बसला आहे. बाळंत महिला ( Pregnant Woman Work In MGNREGA ) , दिव्यांग व्यक्तीसह मृतांच्या नावानेही मजुरी उचलण्यात आली. त्यामुळे नरेगा योजनेत भ्रष्टाचाराचे भूत घुसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. या योजनेची पोलखोल केली आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी. पाहुया या रेवकी गावातील काय आहे वास्तव.
दोन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या नागरिकाच्या नावानेही उचलली मजुरी रेवकी गावातील रोजगार हमी योजनेअंतर्गत 118 कामे चालू आहेत. गावामध्ये जे मजूर दाखवले आहे ते मजूर दिव्यांग आहेत. अशा लोकांना मजूर दाखवून त्यांच्या नावावर पैसे उचललेले आहेत. रेवकीतील एक नागरिकाचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू ( Dead Man Work In MGNREGA ) झाला आहे. त्यांना सुद्धा मजूर दाखवून त्यांच्या नावाने सुद्धा पैसे उचलले आहेत. जवळपास 20 ते 25 कोटींचा भ्रष्टाचार या रोजगार हमीच्या कामात झाल्याचा आरोप बाळासाहेब मस्के यांनी केला आहे. कागदी घोडे नाचवलेले आहेत आणि कुठेही काम झालेले नाही. या मजुरांना सुद्धा माहीत नाही की ते रोजगार हमीच्या कामावर मजूर आहेत. ऑनलाइन फिनो बँकेमध्ये परस्पर खाते उघडून पैसे उचललेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी या कामाची चौकशी लावून जो कोणी संबंधित गुत्तेदार आहे त्याच्यावर योग्य कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
रेवकी गावात तब्बल 118 कामे चालू नरेगा योजनेचा गैरवापर काही लोकांनी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीडच्या रेवकी गावात तब्बल 118 कामे चालू आहेत. यामध्ये शेतरस्ते, पानंद रस्ते, दुतर्फा रस्ते, वृक्ष लागवड, शेततळे, विहीर, सिमेंट रस्ते, अशी विविध कामे करून कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचे या ठिकाणचे गटविकास अधिकारी सांगत आहेत. मात्र या ठिकाणी चक्क मृत व्यक्तीच्या नावावर पैसे उचलले आहेत. त्याचबरोबर गरोदर महिलांच्या नावावरही पैसे उचलण्यात आले. काही महिला कामालाही गेल्या नाहीत, त्यांना माहीत सुद्धा नाही, अशा व्यक्तीच्या नावावर, दिव्यांग व्यक्तीच्या नावावर सुद्धा पैसे उचलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खाली पांढरी अन् वर काळी माती टाकून गचागचा उचलले बील रेवकी गावात पानंद रस्ता होणार होता, मात्र हा रस्ता झालेला नाही. शासनाने जी मालमत्ता दिली ती त्यांनी बोगस उचललेली आहे. हा पांदण रस्ता केलाच नाही, काळाबाजार केला आहे. पांढरी माती आणून टाकली, काळी माती वर टाकली आणि गचागच बिल उचलले. आमच्या शेताजवळ तर आमच्या शेतातला मुरूम आणला आणि कुठे टाकला आणि कुठे टाकला नाही. यांनी शासनाचे वरून पैसे आलेले लुटले, यांनी रस्ताच केला नाही. नुसता मुरुमच टाकला नाही, काळी माती आणि पांढरी माती याची टक्कर लावली आणि आता तर पावसाळ्यात चालता येणार नाही, अशी व्यथा सांगितली या गावातील शेतकऱ्याने. पावसाळ्यात आम्हाला चालता येणार नाही. शासनाकडून तर लाखो रुपये उचलून घेतले. आता रस्ता तरी चांगला करून द्यावा, नाही तर ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी भावनाही या शेतकऱ्याने व्यक्त केली.
बाळंतपणात कामाला कसे जाणार ? माझी डिलिव्हरी 8 मार्चला झाली आहे, डिलिव्हरीच्या अगोदरही मी कुठे कामाला गेलेली नाही. मला त्यावेळेस बेड रेस्ट सांगितला होता. डिलिव्हरी ( Pregnant Woman Work In MGNREGA Scheme At Beed ) नंतरही माझे बाळ लहान होते. त्यामुळे मी कुठेही कामाला केलेले नाही, आता सध्या माझे बाळ नऊ महिन्याचे आहे. मी शेतात कुठेच कामाला गेलेले नाही, हा सर्वच प्रकार चुकीचा आहे. ज्यांनी कुणी हा प्रकार केला आहे, त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आता शिला चोरमले या महिलेने केली आहे.
कुठल्याच कामाला गेलेले नाही मी घरीच असते, कुठल्याही मी कामाला गेलेले नाही. परस्पर त्यांनी माझे नाव लावले व पैसे उचलले आहेत. कुठल्याच कामाला गेलेले नाही. त्यांनी माझ्या नावावर पैसे उचलले आहेत. ज्यांनी कोणी हा प्रकार केला आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सुरेखा सौंदरमल या महिलेने केली आहे. विशेष म्हणजे सुरेखा सौंदरमल यांच्या नावावर पैसे उचलण्यात आले, याबाबत त्यांना माहितीही नव्हते.
दिव्यांग व्यक्तीच्या नावावर उचलली मजुरी अर्जुन चोरमले हे 47 टक्के दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना काठीशिवाय चालताही येत नाही. कोणाचा तरी आधार त्यांना लागतो. मात्र त्यांच्याही नावावर पैसे उचलण्यात आले आहेत. ते मजुरीच्या कामावर गेले, हे ऐकुणच त्यांना धक्का बसला. याविषयी त्यांना विचारले असता, मी अपंग आहे, मी कुठल्याही कामावर गेलो नाही व मला कामावर जाता पण येत नाही. माझे 47 टक्के अपंग प्रमाणपत्र आहे आणि माझ्या नावावर बोगस पैसे उचलले आहेत. मी काठीचा आधार घेतो, काठी शिवाय मला चालता येत नाही. माझ्याकडे पिठाची चक्की आहे. ती पिठाची चक्की आणि घर एवढाच माझा प्रवास आहे. मला संडासला सुद्धा लांब जाता येत नाही, मग मी रोजगार हमीच्या कामावर जाणार कसा असा सवालच्या त्यांनी ईटीव्ही भारच्या प्रतिनिधीला विचारला. माझ्या नावावर पैसे कोणी उचलले हे मला सांगता येणार नाही. मात्र ज्यांनी कोणी पैसे उचलले असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी माझी मागणी असल्याचेही त्यांनी यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला सांगितले.
मृताच्या खात्यावर पैसे कसे जमा झाले, चौकशी करणार याबाबत रेवकीच्या गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी रेवकी या ठिकाणी कामे चालू आहेत. कामाची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्याच्यावर मी कारवाई करेल. मृताच्या खात्यावर जरी पैसे जमा झाले असले तरी त्याचा वारस कोण दाखवला आहे. त्याचे पैसे त्याच्या वारसदाराला दिले आहेत का, काय प्रकार आहे, त्याच्यामध्ये तो व्यक्ती मृत केव्हा आहे आणि त्याचे मस्टर कधी भरले आहे याची चौकशी करण्यात येईल. यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करेल अशी माहिती वैभव जाधव यांनी दिली.