बीड - जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शेतकऱ्यांना 2018 मधील पीक विमा कंपनीने दिला नाही. सातत्याने जिल्हा प्रशासन व पीक विमा कंपनीकडे पाठपुरावा करूनही आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जर आमच्या बँक खात्यावर पिक विमा जमा झाला नाही तर, आम्ही आत्महत्या करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी दिंद्रुड येथील गावात उपोषण सुरू केले आहे.
2018 मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी पीक विमा भरलेला असताना देखील कंपनीने त्यांना विमा दिला नाही. प्रशासनही विमा कंपनीच्या हातातील बाहुले आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्यापेक्षा विमा कंपनीच्या पाठीशी उभे राहत आहे. मागील अनेक दिवसांपासून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड भागातील शेतकरी 2018 च्या पिकविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे हेलपाटे मारत आहेत.
मात्र, अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत अखेर सोमवारी दिंद्रुड येथेच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश सोळुंके यांनी मात्र उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचा प्रश्न समजून घेतला आहे. जर आमच्या बँक खात्यावर 2018 चा पिक विमा जमा झाला नाही तर आम्ही आत्महत्या करू असा इशारा, शेतकरी सुहास झोडगे यांनी दिला आहे. सोमवारी सायंकाळी सहापर्यंत जिल्हा प्रशासनातील एकही अधिकारी उपोषणकर्त्यांकडे फिरकला नव्हता.