बीड - मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली आहे. बीड जिल्ह्यात सुरुवातीला पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र, मागच्या महिनाभरापासून वरुणराजा रुसला असल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. केवळ ढगाळ वातावरण निर्माण होते. पाऊस मात्र पडत नाही. सरकारने कृत्रिम पावसाचे आश्वासन दिले होते. तो कृत्रिम पाऊसदेखील पडला नाही. आज घडीला बीड जिल्ह्यात 6 लाख हेक्टरवरील खरिपाचे पिके धोक्यात आली आहेत. अजून चार दोन दिवसात पाऊस पडला नाही तर, बळीराजावर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. कापूस, तूर, सोयाबीन, उडीद ही पिके सुकू लागली आहेत. शेतकरी मात्र ढगाकडे डोळे लावून बसले आहेत.
बीड जिल्ह्यात 5 वर्षापासून दुष्काळाचे सावट आहे. यंदा तरी चांगला पाऊस होऊन शेती टिकेल अशी आशा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाने दडी मारली आणि सगळ्या स्वप्नांवरच पाणी फिरले. शेतातील कापूस, सोयाबीन, तूर डोळ्यादेखत सुकू लागल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. उसनवारीवर पेरणी केली मात्र आता पैसे परत करायचे कसे? पिकलं नाहीतर शेतकरी उद्धवस्त होतील, अशी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.
बीड तालुक्यातील रुद्रपूर येथील महिला शेतकरी पंचफुला नागरगोजे या सांगतात, की जनावरांना पिण्यासाठी पाणी देखील मिळत नाही. शेतीला पाणी नाही, अशा परिस्थितीत आम्ही जगतोय, त्यामुळे वरुणराजाने आमच्या कृपा करावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.