बीड - भारतात सुरू असलेल्या अनेक वेगवेगळ्या आंदोलनाकडे देश-विदेशातील नागरिकांचे बारीक लक्ष आहे. शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांचे दर प्रचंड वाढले आहेत. यासारख्या अनेक मुद्यांचा सर्वसामान्य नागरिकांना विसर पडावा, म्हणून कपल चॅलेंज सारखी मोहीम सोशल मीडियावर राबवली जात आहे. खरंतर आजच्या घडीला शेतकऱ्यांबरोबर अथवा त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिकपणे रहाणे हेच खरे चॅलेंज आहे. असे मत बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त करत मागील आठवडाभरात सोशल मीडियावर कपल चॅलेंज या सुरू असलेल्या ट्रेंडला विरोध केला आहे.
मागील आठ दिवसापासून सोशल मीडियावर कपल चॅलेंज असे म्हणत जोडीदाराबरोबरचा फोटो शेअर करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासारख्या मोहिमेमुळे सरकारच्या मूळ प्रश्नाकडे सर्वसामान्य नागरिकांचे दुर्लक्ष होते, असे मत व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांनी कपल चॅलेंजबाबत सांगताना म्हटले आहे की, आज प्रत्येकासमोर खरंच चॅलेंज काय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जो शेतकरी उन्हा-तान्हात राब-राब राबतो, कष्ट करतो. त्या शेतकऱ्याच्या विरोधात केंद्र सरकार भूमिका घेत आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मार्गावर खिळे अंथरण्याचे याचे काम केंद्र सरकार करत आहे. अशा बिकट परिस्थितीत बळीराजा जगत असताना त्याच्या भूमिकेबरोबर भारतातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी जायला पाहिजे, हेच खरे प्रत्येकासाठी चॅलेंज आहे. मात्र या सगळ्या बाबींना फाटा देण्याचा नवा फंडा म्हणून सध्या सोशल मीडियावर कपल चॅलेंजच्या नावाखाली मोहीम राबवली जात आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, हायकोर्टातील ज्येष्ठ वकील महेश भोसले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
आता या कपल चॅलेंजनंतर प्रत्येकाने शेतकऱ्याबरोबरचा एक फोटो व त्या शेतकऱ्याच्या वेदना सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात, असे सांगत सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी स्वतः एका महिला शेतकऱ्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून शेतकऱ्यांच्या वेदनेकडे लक्ष वेधले आहे.