बीड - जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम अधिक गतीने सुरू आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 11 हजार 221 नागरिकांना लस दिली गेली आहे. यामध्ये कोरोना काळात फ्रंट लाईनवर काम करणारे विविध विभागातील कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे. यापुढे म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत सुमारे 9 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा आरोग्य विभागासमोर असून जिल्ह्यात एकूण 80 केंद्रावरून लसीकरण मोहीम सुरू असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य परिचारिका तथा लसीकरण मोहीम समन्वयक निलोफर शेख यांनी दिली.
जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आज घडीला जिल्ह्यात 3 हजार कोरोनाबाधित रुग्ण जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमधून उपचार घेत आहेत. दरम्यानच्या काळात लसीकरण मोहिमेला गती देण्यासंदर्भात राज्य सरकारने सर्व जिल्हा रुग्णालयांना आदेशित केलेले आहे. त्यानुसार बीड जिल्हा आरोग्य विभागाने एकूण 80 केंद्र लसीकरणासाठी तयार केले आहेत. यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयाच्या 50 प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असून 15 ग्रामीण रुग्णालय व 15 खासगी रुग्णालयांमधून कोरोना लस दिली जात आहे.
मागील दोन दिवसांपासून 45 वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. 30 एप्रिलपर्यंत 9 लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले असून यासाठी लागणारी तयारी पूर्ण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. बीड जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 27 लाखाच्या घरात आहे. आतापर्यंत 97 हजार 685 नागरिकांना लसीची पहिली मात्रा दिली असून 13 हजार 536 नागरिकांना दुसरी मात्रा दिली आहे. यादरम्यान जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.