बीड - वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाच्या कष्टाप्रती उतराई होण्याचा दिवस म्हणजे बैल पोळ्याचा सण असतो. यंदा कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे ढोल ताशाच्या गजरात सर्जा-राजाची मिरवणूक काढणे संदा शक्य होणार नाही. हे सांगत असताना बळीराजाच्या चेहऱ्यावर होत असलेल्या वेदना स्पष्ट पाहायला मिळत होत्या.
तरीही कोरोनाच्या बिकट काळात परिस्थितीशी लढताना जिल्हा प्रशासन देईल तो आदेश आपल्याला पाळावा लागेल, असा समुजदारपणाही बीड तालुक्यातील तळेगाव येथील शेतकरी हरिदास मस्के यांनी दाखवला आहे. यंदा आम्हाला पोळा सण साजरा करता येत नाही, याचे मोठे दुःख असल्याचेही शेतकरी मस्के यांनी सांगितले.
हेही वाचा - मॉल उघडले तर मंदिर का नाही, राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल
बीड जिल्ह्यात 21 ऑगस्टपर्यंत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळात पोळ्याच्या या सणावर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षी बळीराजा आपल्या शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाची पोळ्याच्या निमित्ताने मिरवणूक काढतो आणि पूजा करतो. यंदा, मात्र सार्वजनिक ठिकाणी पोळ्याची मिरवणूक काढता येणार नाही, असे आदेश जिल्हा प्रशासनाच्या आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी बैलाची सजावट न करतात केवळ घरी बैल पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कृषिप्रधान संस्कृतीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल पोळ्याला खूप महत्त्व आहे. वर्षभर शेतात राब राब राबणाऱ्या सर्जा-राजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न बळीराजा करत असतो. मात्र, यंदा बीड लॉकडाऊन असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बैलांची मिरवणूक काढण्याला जिल्हा प्रशासनाने मनाई केलेली आहे.
हेही वाचा - डॉक्टरांविषयी मला प्रेम, आस्था आणि आदर; अपमान करण्याचा संबंधच नाही : संजय राऊत
कोरोना सारख्या बिकट परिस्थितीशी लढायचे तर फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची सार्वजनिक मिरवणूक काढू नये, असे प्रशासनाने सांगितले आहे. यानंतर प्राप्त परिस्थितीत शेतकरी आपल्या सर्जा-राजाची घरीच पूजा करणार आहेत,क असे शेतकरी हरिदास मस्के म्हणाले. तसेच, सरकारच्या धोरणामुळे आम्हाला बैलपोळा पहिल्यासारखा साजरा करता येणार नसल्याने प्रचंड दुःख होत असल्याचेही त्यांनी सांगितले.