परळी वैजनाथ (बीड) : कोरोना विषाणूची दुसरी लाट शहर व तालुक्यात वेगाने वाढत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा पडला आहे. फेब्रुवारी महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम दिसून येत होता. मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाने ग्रामीण भागातही पाय पसरलेले दिसून येत आहेत. १ एप्रिलपासून 16 एप्रिलपर्यंत तालुक्यात ८८८ रुग्ण आढळले. यातील ग्रामीण भागात ३८५ तर शहरात ५०३ रुग्ण आढळून आले. यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांनी काळजी घेणे, तसेच मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणेही आवश्यक आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुरुवातीला शहरी भागात परिणाम दिसून येत होता. पण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. १ एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंत ८८८ पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये तालुक्यातील कन्हेरवाडी, हेळंब, दौनापूर, नागापूर, खोडवा सावरगाव, तळेगाव, टोकवाडी, सारडगाव, वाका, दौंडवाडी, रेवली, मांडवा, वैजवाडी, मोहा, वाघबेट, नंदनज, देशमुख टाकळी, डाबी, कासारवाडी, ब्रम्हवाडी, कौठळी, नंदगौळ, पौळ पिंपरी, गाढे पिंपळगाव, संगम, मांडवा आदी गावात कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे. दरम्यान मागच्या वर्षी कोरोना रुग्ण आढळून आला की, जिल्हा, तालुका पातळीवरुन यंत्रणा उभी राहत असे. गाव बंद करुन गावाचा आरोग्य सर्वे करण्यात येत असे. संपूर्ण गावात सॅनिटायझर मारला जात असे. बाहेर गावाहून आलेल्या रहिवाशांना क्वारंटाईन करण्यात येत होते. आता मात्र गावात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतरही कोणत्याही उपाययोजना ग्रामपंचायत, आरोग्य विभागाकडून करण्यात येत नाहीत. गावाचे निर्जंतुकीकरणही करण्यात येत नाही. रुग्ण आढळला तर आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतला कोणतीही माहितीही देण्यात येत नाही. रुग्ण आढळून आलेला कळल्यानंतर यासंदर्भात निर्जंतुकीकरण व इतर काळजी घेता येते. यासाठी माहिती मिळणे आवश्यक आहे. कारण आजही गावातील नागरिक ओठ्यावर, पारावर एकत्र गप्पा मारताना दिसून येत आहेत. तसेच आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाने ग्रामपंचायतींना सोबत घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागात कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नागापूर बनले हॉटस्पॉट -
परळी वैजनाथ तालुक्यातील नागापूर गेल्या काही दिवसांपासून कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. १ ते १५ एप्रिलपर्यंत नागापूरमध्ये ६७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात १५ दिवसात या गावातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (१४ एप्रिल) एकाच दिवशी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच नागापूर शेजारी असलेल्या दौनापूर या गावात २० च्या वर कोरोना रुग्ण आहेत.