बीड - हाथरस अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की करून अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंबाजोगाई येथील सावरकर चौकात फलक झळकावून निषेध करण्यात आला.
पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर देशभर असंतोषाचे वातावरण आहे. या प्रकरणावरून काँग्रेस पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारला जाब विचारून कोंडीत पकडले आहे. हाथरस प्रकरणावरून खासदार सोनिया गांधी यांनी भाजप सरकारला जाब विचारल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसकडे रवाना झाले होते. दरम्यान, त्यांना मार्गात रोखून उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याची माहिती माध्यमांमध्ये येत आहे. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापी लाट आहे. बीडमध्ये देखील हा संताप व्यक्त झाला आहे. बीड काँग्रेसच्या वतीने आज अंबाजोगाई येथील सावरकर चौकात फलक झळकावून निषेध करण्यात आला.
हेही वाचा- विवेकने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करू नका - मराठा क्रांती मोर्चा