बीड - शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदी नुकतीच माजलगाव येथील आप्पासाहेब जाधव यांची निवड झाली आहे. शिवसेनेतील जुन्या लोकांना डावलून नवीन चेहऱ्याला पक्षाने संधी दिल्याचा आरोप करत माजलगावचे शिवसेना शहरप्रमुख धनंजय सोळंके यांनी आप्पासाहेब जाधव यांच्या अंगावर काळी शाई टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावरून झालेल्या वादातून आप्पासाहेब जाधवांच्या कार्यकर्त्यांनी धनंजय सोळंके यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे पक्षांतर्गत असलेली खदखद चव्हाट्यावर आली आहे.
अप्पासाहेब जाधवांची निवड झाल्याने सोळंके होते नाराज
अप्पासाहेब जाधव यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर गुरुवारी माजलगाव शहरात रॅली काढण्यात आली होती. शिवसेनेने जुन्या पक्षातील लोकांना डावलून जाधव यांना संधी दिल्यामुळे शहरप्रमुख धनंजय सोळंके हे दुखावले होते. ही निवड चुकीची असल्याचे म्हणत सोळंके यांनी दोन दिवसांपूर्वी चौकात उभा राहून बॅनर झळकवीत निषेध व्यक्त केला होता.
गुरुवारीही सोळंके यांनी केला निषेध
गुरुवारी शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांचे दुपारी माजलगाव शहरात आगमन झाल्यानंतर समर्थकांनी रॅली काढली होती. या रॅलीतही धनंजय सोळंके यांनी पुन्हा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर काळी शाई टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे अप्पासाहेब जाधव यांच्या समर्थकांनी पापा सोळंके यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सोळंके यांना रस्त्यावर पाडून बेल्ट, काठीने त्यांच्या पाठीवर, डोक्यात मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पापा सोळंके यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - मोक्का कोर्टाचे आदेश आल्यानंतरच एनसीबीला मिळणार इकबाल कासकरचा ताबा