बीड - शहरातील करपरा नदीमध्ये 4 वर्षीय बालकाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली. सार्थक विष्णू देवगडे (वय - 4, रा. शिवाजीनगर बीड)असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खूनाचा प्रकार असून अनैतिक संबंधातून ही घटना घडली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आज (बुधवार) दुपारी बीड शहरातील करपरा नदीमध्ये ४ वर्षाच्या मुलाचा मृतदेह असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, त्या ४ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर मार लागल्याचे पाहायला मिळाले. या मुलाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास एपीआय शिवलाल पूरभे करत आहेत.