बीड - तालुक्यातील सफेपूर येथे शनिवारी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती बेटी बचाव बेटी पढाव समितीचे सदस्य तत्वशिल कांबळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित गावात जाऊन चौकशी केली. यावेळी एका ठिकाणी विवाहाची लगबग सुरू होती. सखोल चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत होता. हा विवाह कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने रोखला.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की शनिवारी दुपारी 1 वाजता सफेपूर (ता.जि.बीड) येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी व 20 वर्षीय मुलगा यांचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या मार्गदर्शनाखाली आर. डी. कुलकर्णी (जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बीड) तत्वशिल कांबळे (सदस्य बेटी बचाव बेटी पढाव बीड ) यांनी नेकनूर पोलीस ठाण्याचे ए. व्ही. चाळक, ग्रामसेवक गौतम वाघमारे, पोलीस कर्मचारी बी. एम. काळे, घोडके श्रीराम यांच्या पथकासह सफेपूर गावात जाऊन बालविवाह थांबवला. मुलीच्या व मुलाच्या आई वडिलांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले. मुलीच्या पालकांकडून शपथपत्र घेतले. याशिवाय पोलिसांनी नोटीस देऊन बालविवाह न करण्याबाबत सांगितले.