बीड - कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर नगरपालिकेचे कर्मचारी अंत्यसंस्कार करतात. मात्र अंत्यसंस्कारानंतर संबंधित व्यक्तीच्या अस्थी व राख घेऊन जायला देखील त्याचे नातेवाईक येत नसल्याचे, नगरपालिकेचे कर्मचारी दीपक शेनुरे यांनी सांगितले. बीड शहरातील भगवान बाबा प्रतिष्ठान येथील स्मशानभूमीमध्ये अस्थी ठेवण्यासाठी करण्यात आलेले लॉकर देखील फुल्ल झाले आहे. याठिकाणी 15 पेक्षा अधिक जणांच्या अस्थी नातेवाइकांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र नातेवाईक अस्थी घेऊन जाण्यासाठी येत नसल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 1877 पेक्षा अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जर कोरोनाचे उपचार सुरू असताना रुग्ण दगावला तर मृतदेह नातेवाईंकाना न देता, संबंधित नगरपालिकेच्या यंत्रणेकडून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. बीड शहरातील भगवान बाबा प्रतिष्ठान येथील स्मशानभूमीत मागील चार महिन्यांपासून कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंत्यविधी सुरू आहेत. यामध्ये गंभीर बाब म्हणजे अंत्यविधी झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचे नातेवाईक त्याची राख अथवा अस्थी घेऊन जायला देखील स्मशानभूमीकडे फिरकत नाहीत.
...तर आम्हीच करणार अस्थींचे विर्सजन
यावर बोलताना भगवान बाबा प्रतिष्ठान येथील स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी म्हणाले की, ज्या कोणाच्या अस्थी अथवा राख आहेत. त्यांच्या नातेवाईकांना आम्ही संपर्क करत आहोत. संपर्क करूनही जर अस्थी घेऊन जायला संबंधित मृताचे नातेवाईक आले नाहीत, तर त्या अस्थींचे विसर्जन आम्हीच करणार आहोत.
हेही वाचा - 'राज्यपाल फाईलवर सही करतील तेव्हा संपूर्ण राज्यभवनाला पेढे वाटू'