बीड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या (beed grampanchayat election) कामात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 6 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वडवणीचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी दिले आहेत. (case filed against 6 employees in beed). या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू : ग्रामपंचायत निवडणुकीत वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील 6 कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा केला. त्यामुळे तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस. के. मंदे यांना प्राधिकृत केले. तसेच त्यांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत. आदेशाची प्रत वडवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिली गेली आहे. रात्री उशिरापर्यंत वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सरपंच बिनविरोध : बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्यापैकी 33 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या असून जिल्ह्यातील 671 ग्रामपंचायतीसाठी आज 7:30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. तर 47 गावचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्यातील 323 मतदान केंद्र हे संवेदनशील असून 79 मतदान केंद्र हे अती संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील, अति संवेदनशील मतदान केंद्रात व्हिडीओ शूटिंगही केली जाणार (Gram Panchayat Election Voting in Beed District) आहे.
कोण बाजी मारणार : जिल्ह्यात एकूण 12 हजार कर्मचारी मतदानाच्या प्रक्रियेत आहेत. तर जिल्ह्यातील विविध भागात 3 हजार 500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 2 हजार केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असे 3 हजार 782 अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर 12 हजार 260 कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. सर्वांनी शांततेत मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीत कोण बाजी मारणार, हे निकालानंतरच (Gram Panchayat Election Voting) कळेल.