बीड - केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी खासगी प्रसिध्दीसाठी असलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर राजमुद्रेचा वापर करून संबंधित कार्यक्रम सरकारी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे.
येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका असल्याने सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदारांकडून वेगवेगळे राजकीय तसेच खासगी कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. असाच कार्यक्रम केज मतदार संघातील आमदार संगीता ठोंबरे यांनी रविवारी (दि. ४ऑगस्ट) घेतला. संबंधित कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आला असून, कार्यक्रम पत्रिकेवर राजमुद्रा वापरल्याने संगीता ठोंबरे यांना टिकेला सामोरे जावे लागत आहे.

या कार्यक्रमातून केंद्र व राज्य सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे, असे ठोंबरे यांनी सांगितले. कार्यक्रम मासिकात आम्ही राजमुद्रा वापरली आहे. परंतु, ती वापरण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे की, नाही हे मला माहिती नाही, असे त्या म्हणाल्या.
केज मतदार संघातील हा आमदार जनकल्याण कार्यक्रम 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.