बीड - वारंट नसतानाही नवी दिल्ली पोलिसांनी घराची झडती घेत कॉम्प्युटर हार्डडिस्कसह इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकाराची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शंतनु मुळूक याचे वडील शिवलाल मुळूक यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
निवेदनात काय?
12 फेब्रुवारीला सकाळी 5.30 वाजता माझ्या राहत्या घरी दोन व्यक्ती आले व त्यांनी आम्हाला ते स्वत: दिल्ली पोलीस असल्याचे सांगितले. त्यांचे ओळखपत्र दाखवले आणि म्हणाले की, आम्हाला शंतनुविषयी चौकशी करावयाची आहे. त्यानंतर त्यांनी माझ्या घराची झडती घेत शंतनुच्या रुममधून एका संगणकाची हार्डडिस्क, एक पुस्तक, मोबाईल कव्हर व पर्यावरण पोस्टर जप्त केले. तसेच दिल्ली येथे गेल्यानंतर हे साहित्य परत दिले जाईल, असे तोंडी आश्वासन दिल्ली पोलिसांनी दिले. मात्र, हे सर्व करत असताना त्या दोन पोलिस अधिकार्यांनी आम्हाला शोध अथवा जप्ती संदर्भातील वॉरंट दाखवले नाही. तसेच जप्त केलेल्या वस्तुंचा पंचनामाही केला नाही. ही कारवाई करताना स्थानिक प्रशासनातील अधिकारी त्यांच्यासोबत नव्हता.
हेही वाचा - टुलकिट प्रकरण : आरोपी निकिता जेकबला दिलासा, तीन आठवड्यांचा जामीन मंजूर
12 फेब्रुवारीपासून ते लोक बीडमध्येच थांबलेले आहेत. त्यांनी मला दोन ते तीन वेळा कॉल करुन शासकीय विश्रामगृहावर बोलावून घेत शंतनुबाबत चौकशी केली होती. दिल्ली पोलिसांनी घराच्या झडतीचे पत्र किंवा साहित्य जप्तीचे पत्र न दाखवता त्यांनी कारवाई केली. या प्रकाराची नोंद घेऊन जिल्हाधिकारी व बीड पोलीस अधीक्षकांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही मुळूक यांनी केली आहे.