बीड - जिल्ह्यात रोहयो व फलोत्पादन विभागाच्या वतीने फळे व भाजीपाला उत्पादकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी कार्यशाळेच्या उद्घाटक म्हणून केलेल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी रोजगार हमी योजनेशिवाय ग्रामविकास अर्धवट आहे, असे वक्तव्य केले आहे.
राज्यात ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून अनेक योजना मागच्या पाच वर्षात राबवल्या आहेत. या पुढच्या काळात देखील जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना सरकार राबवणार आहे. मंत्री असताना रोहयो अंतर्गत अनेक लोकाभिमुख कामे केलेली होती. आता रोजगार हमी योजना खाते जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे आहे आणि ग्रामविकास खाते माझ्याकडे आहे, असे असले तरी रोजगार हमी योजना शिवाय ग्रामीण विकास अर्धवटच असतो. असे सूचक वक्तव्य बीडच्या पालक मंत्री व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी बीड येथे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात केले आहे.
बीड येथे फलोत्पादन विभाग व रोजगार हमी यांच्यावतीने फळबाग व भाजीपाला उत्पादकांसाठी एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंचावर रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर हे उपस्थित होते. जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर मंत्रिपद मिळाले. क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे व जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय संबंधाबाबत दोघांमध्ये दरी निर्माण झाली असल्याची चर्चा केली जात होती. मात्र या चर्चा करणाऱ्यांच्या डोळ्यात स्वतः पंकजा मुंडे यांनीच अंजन घातले आहे.