बीड- मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून अखेर बीड जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले आहे. पदाधिकारी निवडीसाठी शनिवारी झालेल्या विशेष बैठकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार शिवकन्या शिरसाट यांना ३२ तर विरोधी भाजप उमेदवार डॉ. योगिनी थोरात यांना २१ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना ३२ तर भाजपचे भारत काळे यांना २१ मते मिळाली. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल घोषित झालेला नाही.
निवडणुकीत भाजपची ३ मते फुटली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का आहे. भाजपच्या शोभा नवले, सविता मस्के, शोभा दरेकर यांनी भाजपशी बंडखोरी केली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीसाठी शनिवारी विशेष सभा झाली. यात राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पदासाठी शिवकन्या शिरसाट तर उपाध्यक्ष पदासाठी बजरंग सोनवणे आणि जयसिंह सोळंके यांनी अर्ज भरले. तर भाजपकडून अध्यक्षपदासाठी डॉ. योगिनी थोरात आणि उपाध्यक्ष पदासाठी भारत काळे यांनी अर्ज भरले. सभा सुरू झाल्यानंतर जयसिंह सोळंके यांनी माघार घेतली. त्यामुळे, शिवकन्या शिरसाट विरुद्ध डॉ. योगिनी थोरात आणि बजरंग सोनवणे विरुद्ध भारत काळे अशी लढत झाली. यात शिवकन्या शिरसाट यांना ३२ मते मिळाली. यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेसोबतच भाजपच्या फुटलेल्या ३ मतांचा समावेश आहे.
हेही वाचा- बीडमध्ये निराधारांची हेळसांड; ५ हजारावर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत