बीड - तालुक्यातील नाळवंडी येथील चारा छावणीवर मागील काही दिवसांपासून जनावरांसाठी चारा मिळत नसल्याने पशु मालक चिंतेत आला आहे. वारंवार छावणी चालकाला सांगूनही चारा मिळत नसल्याचे आरोप करत शेतकरी चंद्रसेन राऊत या पशुमालकासह इतर शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंगळवारी तक्रार केली आहे.
बीड जिल्ह्यात आठ लाखांपेक्षा अधिक पशुधन आहे. या पशुधनाला खाद्य पुरविण्यासठी ६०९ चारा छावण्या सुरू आहेत. अशा परिस्थितीत जनावरांना वेळेवर चारा व पाणी देण्याचे जबाबदारी छावणी चालकांची आहे. मात्र, बीड तालुक्यातील नाळवंडी येथील चारा छावणीवर जनावरांना वेळेवर चारा व पाणी मिळत नव्हते. जनावरांना वेळेवर चारा देण्याबाबत वारंवार छावणी चालकांना सांगून देखील चारा मिळत नसल्याने अखेर चंद्रसेन राऊत या शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांनी मंगळवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या छावणी चालकाची तक्रार केली.
शेतकऱ्यांनी असा केला आरोप-
बीड तालुक्यातील नाळवंडी येथील चारा छावणीवर आमच्या जनावरांना वेळेवर चारा मिळत नाही. गेल्या दोन दिवसांपासून कसलाही चारा जनावरांना दिलेला नाही. चारा केव्हा देणार याबाबत चारा छावणी चालकांना विचारल्यानंतर अरेरावीची भाषा करत आम्हाला धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप देखील चंद्रसेन राऊत या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे.
विशेष म्हणजे कोल्हारवाडी प्रकरणानंतर चारा छावण्यांच्या विषयात जिल्हा प्रशासनाने ठोस भूमिका घेतली असती तर पशु मालकांना चारा छावणी चालकांनी धमकावले नसते. आता नाळवंडी येथील प्रकरणात बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.