आष्टी (बीड) - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मागील वर्षी मुदत संपली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे राज्यातील निवडणुका पुढे लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर 30 डिसेंबरला न्यायालयाने राज्यातील 39 सहकारी संस्थाचे निवडणूक कार्यक्रम चालू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, फक्त बीड जिल्हा बँकेचाच राजकीय दबावापोटी निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणास पाठवला नव्हता. याप्रकरणी 9 फेब्रुवारीला सुनावणी होऊन सर्व याचिका फेटाळून तात्काळ कार्यक्रम चालू करावा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यामुळे बीड मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे.
याबाबत सदर याचिकेची सुनावणी 4 फेब्रुवारीला न्यायमुर्ती एस. पी. गंगापूरवाला आणि एस. ही. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान भाऊसाहेब नाठकर यांच्यातर्फे ॲड. सिध्देश्वर ठोंबरे आणि ॲड. सि. व्ही. ठोंबरे यांनी बाजू मांडली. तसेच निवडणुक कार्यक्रम चालु करावा आणि रिट फेटाळणीबाबत हस्तक्षेप अर्ज केला.
हेही वाचा - परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना लस; दुष्परिणाम तात्पुरते असल्याची दिली माहिती
प्रदीप वैजनाथ जाधव (रा. साढींबा, ता. वडवणी), बापु बन्सी काकडे, मयपती गणपती पालकर आणि धनंजय साबळे (रा.पिपरखेड, ता.वडवणी) यांच्यावतीने ॲड.आर.एन. धोर्डे, ॲड.व्ही. डी. होन, ॲड.पी. डी. बचाठे तसेच महेंद्र गर्जे व अशोक पवार यांच्या वतीने ॲड. नितिन गवारे यांनी युक्तिवाद केला. तसेच सदर प्रकरणात 4 फेब्रुवारी 2021ला युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने 9 फेब्रुवारीला भाऊसाहेब नाटकर आणि इतर सर्व याचिका फेटाळल्या. त्यामुळे बीड जिल्हा बँकेच्या या पूर्वी तयार झालेल्या मतदार यादीवर लवकरच सुरूवात होणार आहे. या उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे सत्ताधाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. तर या आदेशाने भाजप गटामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.